मी नाक्यावर धावत धावत आलो. रस्ता संपूर्ण रक्ताने माखला होता. एकच गोंधळ सगळीकडे उडाला होता. फुटलेल्या काचांचा खच रस्त्याभर पसरला होता. आपादग्रस्त इस्पितळाच्या दिशेने कधीच रवाना झाला होता.
पण त्याच्या अनेक जखमा तो मागे ठेवून गेला होता. अपघात किती तीव्र होता हे आजूबाजूचे वातावरण ,त्या फुटलेल्या काचा, ते सांडलेलं रक्त, कोणीतरी किंचाळल्याचा आक्रोश पुरेपूरपणे मला सांगत होतं.माझ्याच वर्गातला अक्षय नावाचा मुलगा बाईक वर स्टंट करताना अपघातात जखमी झाला होता असं मला कोणीतरी सांगितलं.हे भीषण ऐकताच मी पुरताच त्या वातावरणात गुंतून गेलो.
पोलिसांच्या गाड्यांनी ती जागा संपूर्णपणे व्यापून गेली होती. अनेक वेळा बहरलेला दिसणारा नाका त्यावेळी सुन्न झाला होता. आजूबाजूच्या टपऱ्या स्तब्ध होत्या.इतरवेळी जळणाऱ्या सिगारेटी आपोआप विझल्या गेल्या होत्या. संपूर्ण वातावरणात कोणीतरी अहिर भैरवचा षड्ज तानपुऱ्यात धरावा तसा एक काहीसा सुन्न स्वर आजूबाजूला घूमत होता. क्षणभर मी तिथेच हरवल्यासारखा वाटत होतो. तेवढ्यात आद्याचा एक विचित्र हुंदका मला ऐकू आला. त्याच्या मनातली अस्वस्थ शांतता मला कळून येत होती.म्हणून त्याला मी स्वतःहून आत घेऊन गेलो. का कोणास ठावूक ..पण मी तसा खंबीर आहे असं मला वाटलं.
त्यादिवशी कोणीच कोणाशी बोललं नाही...नाक्यावर पोलिसांच्या गाड्यांची ये-जा चालू होती. कॉलेज सोडताना विचित्र पोकळीतून बाहेर पडल्यासारखं वाटलं.ते रक्त आजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात न्हवतं.तो रक्तरंजित दिवस अंगावर एक मोठा शहारा उमटवून गेला तो कायमचाच.. घरी बातम्यांमध्ये ते विचित्र वातावरण पुन्हा टि.व्ही वर दिसलं . मीडिया ने अगदी पुरेपूर उचलून धरलं होतं. अक्षय हा कोणत्यातरी राजकारणी माणसाचा मुलगा होता. त्यामुळे हे प्रकरण अजूनच चिघळणार असं मला वाटायला लागलय.
No comments:
Post a Comment